हिमाचल प्रदेशमध्ये खराब वातावरणामुळे अनेक अपघाताच्या घटना घडत आहे (फोटो - सोशल मीडिया)
शिमला : भारताच्या उत्तर भागांमध्ये असलेल्या राज्यातील हवामानामध्ये मोठा फरक झाला आहे. खराब हवामान आणि वातावरणामुळे अपघात होत असून यामुळे अनेक पर्यटकांचा मृत्यू होत आहे. काही दिवसांपूर्वी केदारनाथमध्ये देखील अपघात झाला होता. हिमाचल प्रदेशातील रस्ते अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. कुल्लू आणि हमीरपूर येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर एक मुलगी दैव बलवत्तर म्हणून वाचली.
पहिला अपघात कुल्लूमधील रोहतांग खिंडीजवळ झाला, जिथे एक कार दरीत पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, हमीरपूरमध्ये, दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला, परंतु त्याच्यासोबत असलेल्या दोन वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले. मनालीचे डीएसपी केडी शर्मा यांनी अपघाताबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुल्लू अपघात रविवारी (दि.06) सकाळी राहिनाला परिसरात झाला. गाडीत एकूण पाच जण होते, गाडी अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल दरीत पडली. अपघातानंतर लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दुचाकी घसरून दरीत पडली पण मुलीला किरकोळ दुखापत
दुसरी घटना हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूर भागातील आंसला गावातील आहे, जिथे शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव मनसुख कुमार असे आहे, जो त्याचा मित्र कांचन कुमार आणि त्याच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत प्रवास करत होता. डोंगराळ रस्ता निसरडा होता आणि मनसुख त्याच्या बाईकवरून घसरला. यानंतर गाडी थेट दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये गाडी चालक दोन वर्षांच्या मुलीसह १५० फूट खोल दरीत पडला.
बराच वेळ झाल्यावर दोघेही परतले नाहीत तेव्हा कांचनने गावकऱ्यांना आणि पोलिसांना कळवले. रात्री सुरू झालेले बचावकार्य शनिवारी सकाळी यशस्वी झाले जेव्हा पोलिस आणि होमगार्ड पथकाला मनसुख मृतदेह सापडला. तर लहान मुलगी ही जखमी अवस्थेत खंदकात येथे सापडली.. प्राथमिक उपचारानंतर, मुलीला हमीरपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिची प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रशासनाने चौकशीचे आदेश
कुल्लू आणि हमीरपूर येथील दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघातांमागील धोकादायक रस्त्यांची परिस्थिती आणि निष्काळजीपणा ही संभाव्य कारणे असल्याचे मानले जाते. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना, विशेषतः डोंगराळ भागात, काळजीपूर्वक वाहन चालविण्याचे आवाहन केले आहे.