नवी दिल्ली : लोकसभेत (Loksabha) काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज गौतम अदानींच्या (Gautam Adani) मुद्द्यावरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नाव घेत राहुल गांधी यांनी अदानी आणि त्यांच्या जुन्या संबंधांचा उल्लेख केला. राहुल गांधी भाषण संपवून खाली बसले असताना काँग्रेस खासदारांनी ‘भारत जोडो’-‘भारत जोडो’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारत जोडलेलाच आहे, असे विधान केले.
काँग्रेसकडून देशभरात ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यात आली. या यात्रेवर राहुल गांधी यांनी लोकसभेत भाष्य केले. राहुल गांधी म्हणाले, सरकार अदानींना पाठीशी घालत आहे. त्यांनी अदानी व मोदींचे फोटो लोकसभेत दाखवत, या दोघांमध्ये काय नातं आहे? असा सवाल केला. भारत सरकारने अदानीला मदत केल्याचे ते म्हणाले. मात्र, राहुल गांधी भाषण संपवून बसले असताना काँग्रेस खासदारांनी भारत जोडो-भारत जोडोच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर राहुल यांचे भाषण शांतपणे ऐकत असलेले ओम बिर्ला यांनी भारत जोडलेलाच आहे. काळजी करू नका, असे म्हटले.
पोस्टर्सवरून सभापतींनी खडसावले
ओम बिर्ला यांनी संपूर्ण भाषणात राहुल गांधींचे म्हणणे ऐकून घेतले. सत्ताधारी पक्षाच्या आक्षेपानंतरही बिर्ला यांनी राहुल यांना बोलण्याची संधी दिली. मात्र, जेव्हा राहुल गांधींनी लोकसभेत पंतप्रधान मोदी आणि अदानी एकत्र बसलेले फोटो दाखवायला सुरुवात केली. त्यावर आक्षेप घेत लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, अशी पोस्टर्स दाखवू नका.