खांडवा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Crime Increases in India) होताना दिसत आहे. त्यात ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) मुद्दा चर्चेत येत आहे. असे असताना मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याच्या कारणावरून एका हिंदू तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.
राजेंद्र सैनी असे 36 वर्षीय तरुणाचे नाव आहे. राजस्थानमधील राजेंद्र सैनी या हिंदू तरूणाला त्याच्या पत्नीच्या मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाला जोरदार विरोध केला होता. त्यातून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच त्याचा जीव गेल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजेंद्र सैनी हा रोजंदारी मजूर म्हणून काम करायचा. मात्र, पत्नीच्या कुटुंबियांनी केलेल्या मारहाणीत त्याचा जीव गेल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. या तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राजेंद्र सैनी यांचे सासरे मुमताज खान (55), त्यांची पत्नी मुन्नी खान (52) आणि त्यांचा मुलगा सलमान खान (19) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
पत्नी परत न आल्याने सासरवाडीत गेला अन्…
दोन महिन्यांपूर्वी राजेंद्र याची पत्नी अमरीन ही कुटुंबीयांच्या निमंत्रणावरून त्यांना भेटण्यासाठी खांडवा येथे आली होती. पण पत्नी परत न आल्याने राजेंद्र तिला घेण्यासाठी गेला होता. मात्र, अमरीनच्या कुटुंबीयांनी त्याला दोनदा मारहाण केली. सोमवारी तो पुन्हा अमरीनला परत घेण्यासाठी गेला पण कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.