आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी (File Photo : Bus Fire)
कुरनूल : आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठी दुर्घटना घडली. हैदराबादहून बंगळुरूला प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. आगीत अनेक लोक जिवंत जळाल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये ३९ लोक होते असे वृत्त आहे. बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हैदराबादहून प्रवास करणारी बस कुर्नूल शहराच्या बाहेरील उलिंडाकोंडाजवळ येताच मागून येणाऱ्या दुचाकीला धडकली. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे ती पेटली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे आता सांगितले जात आहे.
दरम्यान, कुरनूल जिल्ह्यातील चिन्ना टेक्कुर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल मला खूप धक्का बसला आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्त्वन करतो. शासन आणि अधिकारी जखमींसह बाधित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करतील, असे मुख्यमंत्री नायडू यांनी म्हटले आहे.
आगीची घटना हृदयद्रावक
मुख्यमंत्र्यांचे पुत्र, टीडीपीचे सरचिटणीस आणि राज्यमंत्री नारा लोकेश यांनीही अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेक्कुर गावाजवळ बसला लागलेल्या आगीची बातमी हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांना मी शोक व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो”.
जखमींना कुर्नूल जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल
या अपघातामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक लोक अडकल्याचेही वृत्त आहे. या आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना कुर्नूल जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. संपूर्ण बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.
हेदेखील वाचा : हरियाणात एका शोरूमला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु






