मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्या पतंजलीला केंद्र सरकारची नोटीस, संशयास्पद व्यवहारांबद्दल मागितलं स्पष्टीकरण
योग गुरु बाबा रामदेव यांच्याशी संबंधित पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनी पुन्हा अडचणीत सापडली आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहाराबात केंद्र सरकारने नोटीस बजावली असून स्पष्टीकरण मागितलं आहे. कंपनीला कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आर्थिक गुप्तचर विभागाला कंपनीचे व्यवहार संशयास्पद आढळल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे पतंजली कंपनी आणि बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सध्या तपासाची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असून, या व्यवहारांची अचूक रक्कम किंवा स्वरूप उघड करण्यात आलेले नाही. मंत्रालयाने कंपनीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यासोबतच, पतंजली आयुर्वेदच्या कारभाराची व निधीच्या वापराची सखोल चौकशी होणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, पतंजली आयुर्वेदच्या वतीने देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पतंजली कंपनी वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कंपनीवर करचुकवेगिरी आणि चुकीच्या पद्धतीने टॅक्स परतावा मागण्याचे आरोप लावण्यात आले होते. तसेच, पतंजलीकडून काही गंभीर आजारांवरील उपचाराचे भ्रामक दावे करत जाहिराती केल्याबद्दल न्यायालयाने कडक कारवाई केली होती. सुप्रीम कोर्टाने अशा जाहिरातींवर बंदी घातली होती आणि हे ‘ड्रग्स अॅन्ड मॅजिक रेमेडीज (आपत्तिजनक जाहिरात) कायदा, १९५४’ च्या उल्लंघनात मोडते, असे स्पष्ट केले होते.
Assam Fake Encounters : आसाममध्ये १७१ बनावट चकमकी, सखोल चौकशी करण्याचे आदेश
पतंजली आयुर्वेद ही एक खासगी कंपनी असली तरी तिची एक युनिट ‘पतंजली फूड्स लिमिटेड’ ही शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. या युनिटच्या शेअर्समध्ये चालू महिन्यात सुमारे १०% घसरण झाली आहे. मागील वर्षी देखील या युनिटला सरकारकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सरकारकडून मिळालेली ही नोटीस आणि सुरु असलेली चौकशी पतंजलीसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. कंपनीच्या पारदर्शकतेबाबत आणि आर्थिक नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने याचे भविष्यातील व्यावसायिक परिणाम दिसून येऊ शकतात. पुढील काही महिन्यांत या प्रकरणावर काय निष्कर्ष येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.