देशातील १७ राज्यात मान्सून दाखल (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशासह, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. आतापर्यंत जवळपास १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी रेड अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. देशातील सेव्हन सिस्टर्स म्हणजेच आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम व त्रिपुरा राज्यात मान्सून दाखल झाला आहे.
केरळमध्ये वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातसुद्धा १० ते १५ दिवस आधीच मान्सून आला आहे. आयएमडीने केरळ, पाँडिचेरी, कर्नाटकमध्ये गडगडाटासह पाऊस आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.
कोणत्या राज्यात कसे असणार हवामान?
३० ते १ जूनपर्यंत महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार या राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज आणि उद्या गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यात तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट
गेले अनेक दिवस राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. मान्सूनने महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला असून, मुंबई-ठाण्यासह कोकणात बुधवारी पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसला. पुढील 3-4 दिवसांत राज्याच्या विविध भागांत दमदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातचता राज्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरासह राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Monsoon: राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट; IMD च्या ‘या’ हाय अलर्टने वाढवली चिंता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे.
मेळघाट परिसरात वातावरणात होतोय कमालीचा बदल
धारणी व चिखलदरा तालुक्यात मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे उन्हाळी हंगामातील मूग, भुईमूग, मका, ज्वारी या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.