न्यायालयाचा अवमान करणाऱ्या २४ वर्षीय प्रबल प्रताप सिंगला बेड्या
Supreme Court Row: सर्वोच्च न्यायालयाच गोंधळ घातल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रबल प्रताप सिंहसह दोन जणांना अटक केली आहे. टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १३२, २२१, २२४ आणि ३(५) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, प्रबल प्रताप सिंग (२४) आणि चंद्रभान (२३) हे लखनऊ विद्यापीठातील एलएलबीचे विद्यार्थी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
१० जुलै, २०२६ रोजी, सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना, प्रबल प्रताप आणि इतर विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आयुक्त, या विशेष अनुमती याचिकेच्या (SLP) सुनावणीदरम्यान घडली. प्रबल प्रताप सिंगने न्यायालयाच्या कामकाजादरम्यान गोंधळ घातला आणि सरन्यायाधीशांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याचिकाकर्ता म्हणून स्वतः हजर असलेल्या प्रबल प्रताप सिंगने जाणीवपूर्वक न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय आणला. प्रबल प्रताप यांनी अपमानास्पद आणि असंसदीय भाषा वापरली. न्यायालयाच्या आवारात कागदपत्रे फेकली आणि गोंधळ घालून न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा आणि सरन्यायाधिशाबाबत त्याच्यावर आरोप आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्याचा आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रबल प्रताप सिंगने तक्रारदाराला कथितपणे ढकलले आणि त्यांच्यावर बळाचा वापर करून त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणला.
प्रबल प्रताप यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हा वाद लखनौच्या विशेष मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या एका आदेशाशी संबंधित होता.
याचिकाकर्ता प्रबल प्रताप स्वतःची बाजू मांडत होता. सुनावणी सुरू होताच, खंडपीठाला उद्देशून, “न्यायिक सेवक महोदय, मी तुम्हाला लखनौचे एसीपी विकास नागर यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याचा आदेश देतो.” असे विधान केले. न्यायाधीशांवर ओरडू लागला, त्यांना “न्यायिक सेवक” म्हणू लागला आणि आपण स्वतः “सार्वभौम” म्हणजेच सर्वोच्च असल्याचा दावा करू लागला.
प्रबल प्रताप यांच्या या विधानांवर न्यायमूर्ती विश्वनाथ यांनी, “तुम्ही आम्हाला आदेश देत आहात, असा सवाल केला. त्यावर बोलताना प्रबल प्रताप म्हणाले की, “मी सार्वभौम आहे.” पण हा प्रकार इथेच थांबला नाही, प्रबल प्रताप यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे सरन्यायाधीशांसमोर उधळली. न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने पकडून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्याबाबतही अपशब्द वापरले. या सर्व प्रकारामुळे काही वेळासाठी न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. आता या सर्व प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरदेखील चांगलाच व्हायरल झाला.
भारताचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मुलांकडून कधीकधी चुका होतात. पण आपल्या घटनात्मक संस्थांचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांचा पूर्ण आदर करणे आणि त्यांचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणे, ही केवळ न्यायपालिकेतील लोकांचीच नव्हे, तर देशातील सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. न्यायपालिकेसारख्या घटनात्मक संस्थांप्रति आदर हा लोकशाहीच्या बळकटीसाठी आवश्यक आहे आणि ही जबाबदारी केवळ न्यायाधीश किंवा वकिलांवर नाही, तर संपूर्ण समाजावर आहे.”






