Photo Credit : Team Navrashtra
चंदीगड: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना इशारा देणारे पत्र लिहिले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली नाही तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणखी आठ महामार्ग प्रकल्प रद्द करू, असे गडकरींनी मुख्यमंत्री मान यांना दिला आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत 14,288 कोटी रुपये आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेवर झालेल्या हिंसक घटनांनंतर गडकरींनी हे पत्र लिहिल्याची माहिती आहे.
गडकरींनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, NHAI दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेसह पंजाबमध्ये अनेक ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड NH कॉरिडॉर विकसित करत आहे. पण मान यांना लिहीलेल्या NHAI अधिकारी, कंत्राटदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय भूसंपादनाबाबतही त्यांनी मुद्दे मांडले आहेत. याच वेळी गडकरींनी मान यांना लिहिलेल्या पत्रासोबत हल्ल्याची छायाचित्रेही जोडली आहेत.
गडकरींनी आपल्या पत्रात लिहीले आहे की, ” मी विनंती करतो की राज्य सरकारने तात्काळ सुधारात्मक पावले उचलावीत, एफआयआर नोंदवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. त्यामुळे NHAI अधिकारी आणि सवलतीधारक कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो. 15 जुलै NH प्रकल्पांच्या आढावा बैठकीत भूसंपादन आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित समस्या आणि बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे, अनेक कंत्राटदार सवलतीधारकांनी करार रद्द करण्याची विनंती केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली नाही तर आणखी आठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याशिवाय एनएचएआयकडे पर्याय राहणार नाही,असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच,यासंदर्भात कोणतीही प्रगती झाली नसून परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. हे सर्व ग्रीनफिल्ड कॉरिडॉर आहेत आणि जर एक पॅकेजही रद्द केले तर संपूर्ण कॉरिडॉर निरुपयोगी होईल. NHAI ने जमिनीच्या अनुपलब्धतेचे कारण देत 104 किमी लांबीचे आणि 3,263 कोटी रुपये खर्चाचे तीन महामार्ग प्रकल्प आधीच रद्द केले असल्याचेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.