'सिंधूचं पाणी रोखलं तर युद्ध अटळ'; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची भारताला धमकी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील जनतेत पाकिस्तानविरोधात तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संसदेत भाषण करताना भारताने सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर युद्ध अटळ असल्याचं म्हटलं आहे. “ही गोष्ट २४ कोटी लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आम्ही भारताला योग्य उत्तर देऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.
उत्तराखंडमध्ये 6000 पोलिस, PAC च्या १७ आणि पॅरा मिलिटरीच्या 10 कंपन्या तैनात; नक्की कारण काय?
डार म्हणाले की,सौदी अरेबिया, यूएई, चीन, तुर्की यांसारख्या अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवेदनात पाकिस्तानचे हित जोपासणारे बदल घडवून आणल्याचा दावा केला. डार यांनी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी दर्शवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
डार म्हणाले, “भारत नॅरेटिव्ह तयार करण्यात अयशस्वी ठरला आहे. सिंधू जलकरार संपुष्टात आणण्यासाठी हे सर्व नाट्य केलं जातंय का? यावर अनेकांना शंका आहे. मात्र, याबाबत ठोस पुरावे आमच्याकडे नाहीत. तसंच पाकिस्तानचा या हल्ल्यात काही सहभाग नाही, ठामपणे सांगतो, असं त्यांनी म्हटलं आहे.डार यांनी यावेळी सौदी अरेबिया, यूएई, कतार, चीन, युनायटेड किंगडम, तुर्की, इराण, कुवैत, बहरीन आणि हंगेरी यांसह अनेक देशांशी भारत-पाकिस्तान तणावावर चर्चा केल्याचंही सांगितलं.