तृणमूल काँग्रेसमध्ये भुकंप; दोन खासदारांचे राजीनामे, २० हून अधिक नॉट रिचेबल
West Bengal Politics: पश्चिम बंगालच्या विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षातही फूट पडल्याचे निश्चित झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र व्यवस्थेची मागणी केली आहे. या खासदारांनी आपल्या पत्रात एनडीएमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये अरूप चक्रवर्ती, पार्थ भौमिक, शताब्दी रॉय, जगदीश वसुनिया, काकोली घोष दस्तीदार, प्रसून बॅनर्जी, कालीपदा सोरेन, शर्मिला सरकार, जून मालिया, वापी हल्दर, असित माल आणि सुवेंदू शेखर रॉय यांचा समावेश आहे. काकोली घोष दस्तीदार यांना बंडखोर गटाच्या नेत्या म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाल्या असतानाच या घडामोडी घडल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. टीएमसीचे राज्यसभा सदस्य सुखेंदू रॉय आणि खासदार कोएल मल्लिक यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय पक्षातील २० हून अधिक खासदार संपर्काबाहेर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यापैकी काही खासदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते भुपेंद्प यादव यांच्या निवासस्थानी काही टीएमसी खासदारांची बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी उपस्थित असल्याचाही दावा केला जात आहे.
ममता बॅनर्जी दिल्लीत असतानाच पक्षातील काही खासदार भाजपच्या संपर्कात आल्याच्या चर्चेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारण ढवळून निघाले आहे. तृणमूल खासदारांच्या या हालचालींमुळे टीएमसीमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्ष नेतृत्व हे बंड रोखण्यात यशस्वी ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपर्काबाहेर असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या किंवा बंडखोर गटाशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या नेत्यांमध्ये सुखेंदू शेखर रॉय, शर्मिला सरकार, जगदीश वासुनिया, कालीपदा सोरेन, प्रसून बॅनर्जी आणि अरूप चक्रवर्ती यांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
टीएमसीचे ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर यांनी आपल्या राज्यसभा पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडला. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी पक्षाच्या पराभवासाठी ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या राजवटीला जबाबदार धरले आणि भाजपची प्रशंसा केली. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी सुखेंदू शेखर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
राजीनाम्यानंतर सुखेंदू यांनी माध्यमांना सांगितले की, “पक्षातील अनेकजण मनमानीपणे पक्ष चालवत होते, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. सुखेंदू शेखर यांची राज्यसभा जागा पश्चिम बंगालमधील असून, त्यांचा कार्यकाळ २०२९ पर्यंत होता. ही जागा रिक्त झाली असून, आता पोटनिवडणूक होऊ शकते.”
बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जी म्हणाले, “सुखेंदू यांचे विधान बहुतांशी बरोबर आहे.ही केवळ सुखेंदू यांची वैयक्तिक बाब नाही. मी सुखेंदू यांच्याशी थेट बोललो नाही, पण मी टीव्हीवर त्यांची वक्तव्ये पाहिली आणि ऐकली आहेत. मी त्यांच्याशी सहमत आहे. राज्यसभेच्या कामकाजाबाबत सुखेंदू यांचे विधान बहुतांशी बरोबर आहे. संसद हे प्रश्नमंजुषा खेळण्याचे ठिकाण नाही.”






