बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता; डोंगराळ भागांत बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली, 27 ऑक्टोबरपासून तर... (File Photo : Cyclone)
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 27 ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच भागात अलिकडच्या काळात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे या प्रदेशात हिवाळा आला आहे. तिन्ही भागात तापमानातही घट झाली आहे. भुवनेश्वर हवामान केंद्राने सांगितले की, ‘गेल्या काही तासांत ही प्रणाली पश्चिम-वायव्येकडे सरकली आहे आणि ती या दिशेने पुढे सरकत राहण्याची अपेक्षा आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत ते कमी दाबाच्या क्षेत्रात, २६ ऑक्टोबरपर्यंत अधिक तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात आणि २७ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत चक्रीवादळात विकसित होईल’, असा अंदाज आहे.
हेदेखील वाचा : ऐन ऑक्टोबरमध्ये देशातील ‘या’ राज्यात मुसळधार पाऊस; तब्बल 1.46 लाख लोकांना फटका, अक्षरश: बर्फवृष्टीच सुरु
वादळ कुठे धडकेल हे निश्चित करणे अद्याप कठीण आहे. मात्र, २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी जिल्ह्यांवर याचा विशेष परिणाम होईल. हवामान खात्याने शुक्रवारी १२ जिल्ह्यांसाठी, शनिवार आणि रविवारी २१ जिल्ह्यांसाठी आणि सोमवारी संपूर्ण राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून
ओडिशाचे मंत्री सुरेश पुजारी म्हणाले की, राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ऑक्टोबरमध्ये सामान्यतः चक्रीवादळ येण्याची शक्यता असते, परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार पूर्णपणे तयार आहे.
ढगाळ आकाश आणि बर्फवृष्टीची शक्यता
जम्मू आणि काश्मीरमध्ये आजपासून ढगाळ आकाश आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे.
जम्मू आणि श्रीनगरमध्ये मिश्र हवामान परिस्थिती अनुभवण्यात येत आहे. दिवसा कडक सूर्यप्रकाश आणि रात्री थंड वारे यामुळे हवामान थंड होत आहे. हवामान खात्यानुसार, ३ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ आकाश अपेक्षित आहे. २८ ऑक्टोबर रोजी उंचावरील भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्यानुसार, २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दक्षिण बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम आणि हावडा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ ऑक्टोबर रोजी कोलकाता आणि हावडा येथेही वादळ आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी उत्तर बंगालमधील जलपाईगुडी, अलीपुरद्वार, कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर आणि मालदा या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.






