
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देणार आहे. दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे नियुक्तीपत्रक दिलं जाणार आहे. याचा लाभ देशभरातील ५१ हजार तरुणांना होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार २८ ऑक्टोबर २०२३ रोजी रोजगार मेळाव्यात सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या ५१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. पंतप्रधान दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याच्या या कार्यक्रमात सामील होतील, ज्यामध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जातील. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी तरुणांना संबोधितही करणार आहेत.
वाढती बेरोजगारी लक्षात घेता केंद्र सरकारकडून आज देशातील ३७ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्रक देण्यात येणार आहे. नियुक्ती झालेल्या तरुणांना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विविध विभागांमध्ये नोकरी दिली जाणार आहे.
दरम्यान, देशभरातून निवड झालेले नवनियुक्त कर्मचारी हे रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य मंत्रालय यासारख्या सरकारच्या विविध विभागांतून आलेले आहेत. रोजगार मेळावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी एक मोठे पाऊल आहे.
नियुक्त केल्या जाणार्या सरकारी कर्मचार्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी मिळेल. ७५० हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे कर्मचारी कुठूनही आणि कोणत्याही उपकरणाद्वारे त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात.