मुंबई : मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची 31 ऑगस्टला बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. देशातील 26 विरोधी पक्षांचे नेते बैठकीसाठी मुंबईत येणार आहे. त्यापूर्वीच आता राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी ‘राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार’ असणार असल्याचे जाहीर केले आहे.
2024 च्या निवडणुकीचे निकाल पंतप्रधान कोण होणार हे ठरवतील; परंतु राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार असल्याचा दावा मुख्यमंत्री गहलोत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. तसेच 2014 मध्ये भाजपला केवळ 31% मतं मिळाली होती. 69% मतं त्यांच्या विरोधात होती. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहंकार दाखवू नये. इंडिया आघाडीच्या बैठका सुरू झाल्यापासून एनडीएत खळबळ माजलेली आहे. याशिवाय देशातील जनताही मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळलेली आहे. जनतेच्या दबावामुळे विरोधक एकवटले आहेत. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी जनतेला जी आश्वासनं दिली होती, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही, असेही गहलोत यांनी सांगितले.
वैयक्तिक काहीही नको
मला वैयक्तिक काहीही नको आहे. फक्त सर्वांना एकत्र करायचे आहे. बैठकीत सहभागी होणार आहे. इतर काही पक्षही सामील होतील. कोणी काय म्हणतो याने आम्हाला फरक पडत नाही. भाजपाच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही.
– नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार