Election Result : पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यांचे निकाल आज; देशाच्या राजकारणात (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली : आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेसाठी मतदान घेतले गेले होते. आता या निवडणुकीचे निकाल आज समोर येणार आहेत. हे निकाल देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार बनले, तर विरोधक पुन्हा एकदा ‘भाजपमुक्त’ महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न करू शकतात.
काँग्रेसचा एक गट आधीच नितीशकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसेच, बंगाल जिंकल्यास टीएमसी मध्यावधी निवडणुकांबाबत किंवा पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत तेलगू देशम पार्टीशी (टीडीपी) चर्चा करू शकते. गरज पडल्यास विरोधी पक्षांकडून चंद्राबाबू नायडू यांना पंतप्रधानपदाचा प्रस्तावही दिला जाऊ शकतो. ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, विजयानंतर त्या राष्ट्रीय राजकारणात मोठी पावले उचलतील. या निकालांमुळे देशातील उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष अधिक चिघळू शकतो. इतकेच नव्हे तर, त्यामुळे उत्तर आणि पूर्व यांच्यात एक नवीन आघाडीही निर्माण होऊ शकते.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आधीच ‘१६’ या आकड्याचा उल्लेख केला आहे. त्यांचा हा इशारा टीडीपी खासदारांच्या संख्येबाबत होता. त्यांनी यावर कोणतीही स्पष्टता दिली नसली, तरी त्यांनी आपले म्हणणे मांडले असल्याचे सांगितले आहे. याचा उलगडा येणाऱ्या काळात होऊ शकतो.
महिला आरक्षण विधेयकावर जेव्हा त्यांची आघाडी सरकारला सभागृहात हरवू शकते, तेव्हा काही खास पक्षांनी पंतप्रधानपदावरील आपला दावा सोडला, तर भाजपला केंद्रातून हटवता येऊ शकते. हे पद टीडीपी, टीएमसी किंवा जेडीयूला देण्यासाठी विरोधक तयार झाल्यास हा बदल शक्य आहे.
काँग्रेस नेत्यांची जेडीयू खासदारांशी चर्चा
काँग्रेसच्या काही नेत्यांनी जेडीयूच्या काही खासदारांशी चर्चा केली आहे. त्यांनी खासदारांना बिहारमध्ये तुम्हाला बाजूला सारण्यात आले. भाजपच्या गर्दीत सामील व्हायचे की नाही, हा निर्णय तुमचा आहे. पण नितीश यांच्या हातात केंद्र सरकारचे रिमोट द्यायचे असेल, तर नितीश यांनी स्वतः सुरू केलेली संयुक्त विरोधकांची मोहीम पुढे नेण्याचे कार्य करावे.
ममतांनी टीडीपीशी चर्चा केली तर..
ममतांनी टीडीपीशी चर्चा केली, तर राजकीय परिस्थितीत निश्चितपणे बदल होऊ शकतो. भाजपने अलीकडेच टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे काही महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित ठेवले आहेत. भाजप आपल्या मित्रपक्षांवर दबाव टाकून काम करते, तर याउलट ‘इंडिया’ आघाडीत सर्व सहकाऱ्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.






