File Photo : BJP
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय तजिंदर सिंग बिट्टू (Tajinder Singh Bittu) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तजिंदर सिंग बिट्ट यांनी त्यापूर्वी अखिल भारतीय काँग्रेसचे हिमाचल प्रदेश प्रभारी सचिव पदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

तजिंदर सिंग बिट्टू यांनी शनिवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. बिट्टू हे जवळपास 12 वर्षे राजकारणापासून दूर राहिले होते. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेससाठी काम करण्यास सुरुवात केली. बिट्ट यांची पंजाबमधील राजकारणात आणि व्होट बँकेवर मजबूत पकड असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीच्या आधी अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या पक्षाला रामराम करत हाती कमळ घेतले होते. आता बिट्टू यांचे पक्षातून जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
एक दिवस आधी काँग्रेसचे राष्ट्रीय मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला होता. मी याद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि अखिल भारतीय काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी सचिवपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.






