राम मंदिर दानचोरीप्रकरणी नवीन SIT स्थापन करा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर दानचोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने सरकारला नव्याने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, तपासाला योग्य आणि ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी या नवीन तपास पथकाचे नेतृत्व एखाद्या वरिष्ठ व तज्ज्ञ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावे.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना उत्तर प्रदेश सरकारकडून यासंदर्भात योग्य अधिकाऱ्याचे नाव घेऊन येण्यास सांगितले. याप्रकरणाच्या पुढील सुनावणीत सरकारकडून तपास अधिकाऱ्याचे नाव मागवण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ जुलै रोजी होईल. सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात स्थिती अहवाल दाखल केल्याचे सांगितले. त्यांनी न्यायालयाला माहिती दिली की, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सरन्यायाधीशांनी विचारणा केली की, सध्याची दानचोरीचा तपास कोण करत आहे? यावर सॉलिसिटर जनरल यांनी उत्तर दिले, सत्य शोधण्यासाठी एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती. पोलिस आता तपास करत आहेत. एसआयटीला असे आढळून आले की, हा एक दखलपात्र गुन्हा आहे. तपास अजून सुरू असल्याने आम्ही या टप्प्यावर फारसा खुलासा करू शकत नाही.
मुद्यावरुन राजकारण करू नका
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यांनी नमूद केले की, हा तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि कोणत्याही भेदभावाशिवाय झाला पाहिजे. तसेच तो एका तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचला पाहिजे. सरन्यायाधीशांनी बजावले की, दानचोरीच्या या प्रकरणाला राजकीय रंग दिला जाऊ नये, कारण न्यायालये हे राजकारणाचे ठिकाण नाहीत. हे गुन्हेगारी स्वरूपाचे एक थेट प्रकरण असून, तपास योग्य व पारदर्शक पद्धतीने व्हावा, एवढीच आमची खात्री करून घेण्याची इच्छा आहे.
प्रभू श्रीरामांचे दागिने वितळवून खरेदी केली मालमत्ता
राम मंदिरासाठी दान केलेल्या वस्तूंच्या चोरीप्रकरणी पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. प्रभू श्रीरामाला अर्पण केलेले दागिने वितळवणाऱ्या अयोध्या येथील सोनाराचा त्यांनी शोध घेतला आहे. पोलिसांनी बुधवारी अनुकल्प, लवकुश आणि करुणेश यांना तुरुंगातून ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कसून केलेल्या चौकशीदरम्यान, अनुकूलने ९० तोळे दागिने वितळवल्याची कबुली दिली.






