सुप्रीम कोर्टात याचिका दाखल (फोटो- सोशल मिडिया)
सोनम वांगचूक आणि अन्य आंदोलकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आता थेट सुपीरम कोर्टात दाद मागण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतर-मंतरवरून ताब्यात घेऊन दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच अन्य आंदोलकांना देखील तेथून हटविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते आहे. यानंतर काही तासांच्या आतच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच भारतीय सरन्यायाधीश यांच्यासमोर याचिका दाखल करण्यात आली असून यावर तातडीच्या सुनावणीची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे वांगचूक यांना ताब्यात घेतल्याचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.
मागील 20 दिवसांपासून जंतरमंतर मैदानावर सीजेपी आणि सोनम वांगचूक हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली हायकोर्टात धाव घेण्यात आली होती. हायकोर्टाने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत सरकारला काही आदेश देखील दिले होते. मात्र आज सकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रूग्णालयात दाखल केले.
अभिजीत दिपकेवर शाईफेक
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. याचदरम्यान एका महिलेने त्यांच्यावर शाईफेक केल्याने आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित आंदोलकांनी संबंधित महिलेला तात्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या दिल्ली पोलीस तिची चौकशी करत आहेत.
अभिजीत दिपके यांनी आंदोलकांना संबोधित करताना सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने आंदोलनस्थळावरून हटवले, त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “त्यांना गुन्हेगारांप्रमाणे उचलून नेण्यात आले. आंदोलन कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे आता मी त्यांच्या जागी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहे,” असे त्यांनी सांगितले.






