नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Elections Result 2024) समोर आला आहे. यामध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यानुसारच, आता त्यांच्याकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या शनिवारी (दि.8) होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्यासह अनेक परदेशी पाहणे हजर राहणार आहेत.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला भूतान, नेपाळ आणि मॉरिशसच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये, व्हीव्हीआयपींसह 8000 हून अधिक पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यात आताही हजारो नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 292 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केल्यामुळे मोदी 8 जून रोजी रात्री 8 वाजता शपथ घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रपती भवनाकडून यापूर्वीच एक निवेदनही जारी करण्यात आले आहे. या निवेदनानुसार, बुधवारी 5 जून ते 9 जून या कालावधीत राष्ट्रपती भवनाचे सर्किट-1 सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
शेख हसीना, विक्रमसिंघे सलग तिसऱ्यांदा शपथविधीला
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे या परदेशी नेत्यांपैकी अनेकांची उपस्थिती असणार आहे. ही नेतेमंडळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.