नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले... (Photo Credit- Social Media)
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. जगदीप धनखड यांनी या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये वैद्यकीय कारण दिले असले तरीही राजकीय स्तरावर चर्चा सुरु आहेत. त्यातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपतिपदाचा राजीनाम्याचा संबंध बिहार निवडणुकीशी जोडला आहे. धनखड यांचा राजीनामा बिहारमधील नेत्यासाठी घेण्यात आला आहे, असे रावत यांनी म्हटले आहे.
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. आता काँग्रेस नेते रावत यांनी राजीनाम्यामागे अनेक कथा आहेत. धनखडजींच्या राजीनाम्याची अचानक सुरुवात आणि वेळेची निवड या दोन्ही गोष्टी अनेक कथा, अनेक गोष्टी सांगतात आणि या राजीनाम्यामागील कारण खूप खोल असून, फक्त पंतप्रधान किंवा जगदीप धनखड हेच ती स्पष्ट करू शकतात. ते दिवसभर सक्रिय होते, त्यांचे दोन-तीन दिवसांचे कार्यक्रम निश्चित होते. त्यांना व्यवसाय सल्लागार समितीची बैठक घ्यावी लागली. उपराष्ट्रपती म्हणून राजस्थानला जावे लागले. ते 7-7.30 पर्यंत विरोधी नेत्यांना भेटतात आणि राजीनामा 9 वाजता येतो, असेही रावत म्हणाले.
दरम्यान, जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला, त्यामागे त्यांच्या आरोग्याच्या कारणांव्यतिरिक्त आणखी खोलवरची कारणे आहेत. धनखड यांचा राजीनामा त्यांच्याबद्दल बरेच काही सांगतो आणि त्यांना उपराष्ट्रपतिपदावर आणणाऱ्यांच्या हेतूंवरही गंभीर प्रश्न उपस्थित करतो, असे काँग्रेसने म्हटले आहे.
नितीशकुमार यांना हटवण्याचा कट
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा हा भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना हटवण्याच्या उद्देशाने रचलेला कट असल्याचा दावा बिहारमधील विरोधी पक्ष राजदने मंगळवारी केला. विधानसभेतील राजदचे मुख्य प्रतोद अख्तरुल इस्लाम शाहीन यांनी दावा केला की, बऱ्याच काळापासून भाजप नितीशकुमार यांना हटवून स्वतःचा मुख्यमंत्री बनवू इच्छित आहे. ज्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएचा पराभव निश्चित आहे, त्यापूर्वी ते हताश झाले आहेत, असे म्हटले आहे.
या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु
भाजपच्या अंतर्गत गोटात देखील काही वरिष्ठ नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यात जे.पी. नड्डा, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, मनोज सिन्हा आणि वसुंधरा राजे यांचा समावेश आहे. मात्र, या कोणत्याही नावामध्ये सर्व राजकीय समीकरणे संतुलित करण्याची क्षमता दिसून येत नसल्याची चर्चा आहे.