‘आप’च्या प्रचारासाठी सुनीता केजरीवाल मैदानात! दिल्लीतील मतदारसंघात करणार रोड शो

आपचे स्टार प्रचारक म्हणून सुनीता केजरीवाल आपचा प्रचार करणार असल्याचे समोर आले आहे.  

    दिल्ली – लोकसभा निवडणूकीचे वारे देशभर वाहत आहेत. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया देखील पार पडत आहे. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कारागृहामध्ये आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीमध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार कोण करणार हा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला होता. आता अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी स्वतः प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत. आपचे स्टार प्रचारक म्हणून सुनीता केजरीवाल आपचा प्रचार करणार असल्याचे समोर आले आहे.

    मार्च महिन्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. दिल्लीमधील कथित मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. मागील एक महिन्यामध्ये त्यांना अटक झाली असून खटला सुरु आहे. यामुळे ते कारावासामध्ये असल्यामुळे निवडणूकीच्या प्रचाराची धुरा सुनीता केजरीवाल यांच्याकडे आली आहे. येत्या 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. अजूनही एक महिना मतदानाला शिल्लक असताना सुनीता केजरीवाल उद्या, शनिवारला पूर्व दिल्ली मतदारसंघात रोड शो करणार आहेत. या मतदारसंघात आपचे कुलदीप कुमार उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे येत्या रविवारी त्या पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात रोड शो करणार असल्याची माहिती दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी दिली आहे.

    या मतदारसंघात आपचे महाबल मिश्रा उमेदवार आहेत. या दोन रोड शोला कसा प्रतिसाद मिळतो, यावर आपच्या प्रचाराची रणनीती ठरणार आहे. या रोड शोला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्यास सुनीता केजरीवाल यांचे गुजरात, हरियाणा, पंजाब व दिल्लीत रोड शो आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना 7 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली असून पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर त्यांचा जामीन अवलंबून आहे.