Assam CM Oath : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हिमंत बिस्व सरमा; गुवाहाटीत समारंभाची तयारी सुरु
नवी दिल्ली : आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. त्यानंतर आता राज्यात भाजप सरकार स्थापन होत आहे. भाजप नेते हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्त्वात हे सरकार चालणार आहे. आज गुवाहाटीमध्ये केवळ शपथविधी सोहळाच नाही, तर आसामी राजकारणातील सर्वात मोठे शक्तीप्रदर्शनही पाहायला मिळणार आहे. गुवाहाटीच्या खानापारा येथे या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सरमा सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसर हाय सिक्युरिटी झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. भाजप हा शपथविधी सोहळा ईशान्य भारतात आपली पकड सातत्याने मजबूत होत असल्याचे प्रतीक म्हणून सादर करत आहे. विकास, कायदा आणि सुव्यवस्था, तसेच आक्रमक संघटनात्मक रणनीतीच्या जोरावर एनडीए निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा सत्तेवर परतली आहे. आता सर्वांचे लक्ष नव्या मंत्रिमंडळावर आणि हिमंता सरकारच्या पुढील कामकाजावर लागले आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा सत्तेवर परतून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने आपली राजकीय आघाडी कायम राखली आहे. राज्यात १२६ पैकी १०२ जागा जिंकून एनडीएने दणदणीत कामगिरी केली. भाजपने एकट्याने ८२ जागा जिंकून आपली पकड अधिक मजबूत केली. या दणदणीत बहुमतासह, हिमंता बिस्वा सरमा सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांची लोकप्रियता आणि कुशल रणनीतीमुळे आघाडीला हे ऐतिहासिक यश मिळाले आहे. काँग्रेस आणि विरोधी आघाडी अनेक भागांमध्ये प्रभावी आव्हान उभे करण्यात अपयशी ठरली, याचा फायदा भाजपला झाला.
हिमंता यांच्यासोबत चार आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्माननीय उपस्थितीत चार ज्येष्ठ नेते रामेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो आणि अजंता नेओग या त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतील. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ आमदार रणजित दास यांना आसाम विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून नामांकित करण्यात आले आहे. आपल्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करताना, मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, ही नवीन टीम एक मजबूत, विकसित आणि समृद्ध आसाम घडवण्यासाठी पूर्ण समर्पणाने एकजुटीने काम करेल.






