Punjab Flood : राघव चड्ढा यांच्यानंतर आणखी एका आपच्या खासदाराचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; एका महिन्याचा दिला पगार (File Photo : Rain)
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यात दिल्ली, हिमाचल प्रदेशसह पंजाबमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना आता आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पूरग्रस्त राज्यासाठी आपल्या स्थानिक क्षेत्र विकास (एलएडी) निधीतून 3.25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यांच्यानंतर आता खासदार स्वाती मालीवाल यांनीही मदत जाहीर केली.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी यापूर्वीच मदतीची घोषणा केली. त्यांच्या मदतीनंतर आता राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत मागितली होती. स्वाती मालीवाल यांनी पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांचा एक महिन्याचा पगार देणार असल्याचे सांगितले.
देश में कहीं कोई संकट आए तो पंजाबी दिल खोलकर वहाँ सेवा करने पहुँचते हैं। आज पंजाब बाढ़ की चपेट में है, बहुत नुक़सान हुआ है।
मैं अपनी एक महीने की सैलरी पंजाब के बाढ़ पीड़ितों के लिए डोनेट कर रही हूँ। ये बहुत छोटी पहल है लेकिन मुझे उम्मीद है और लोग इस पहल से जुड़ेंगे। वाहेगुरु जी…
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 3, 2025
स्वाती मालीवाल यांनी बुधवारी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जर देशात कुठेही संकट आले तर पंजाबी लोक सेवा करण्यासाठी मोकळ्या मनाने तिथे पोहोचतात. आज पंजाब पुराच्या विळख्यात सापडला आहे, खूप नुकसान झाले आहे. मी माझा एक महिन्याचा पगार पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी दान करत आहे. हा एक अतिशय छोटासा उपक्रम आहे, परंतु मला आशा आहे की, या उपक्रमात अधिक लोक सामील होतील. वाहेगुरुजी सर्वांना मदत करा’.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि म्हटले होते की, ‘देशावर आलेल्या कोणत्याही आपत्तीविरुद्ध पंजाब नेहमीच उभा राहिला आहे. आज पंजाब संकटात आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना या कठीण काळात पंजाबच्या लोकांना शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करण्याचे आवाहन करतो. आम आदमी पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन पंजाब मुख्यमंत्री मदत निधीला देत आहेत. आपण सर्वजण मिळून पंजाबला या भयानक आपत्तीपासून वाचवू या’, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.