तेलंगणाच्या युवा आमदार लस्या नंदिता यांचा अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीही झाला होता अपघात

तेलंगणाच्या युवा आमदार लस्या नंदिता यांचा अपघातात दुःखद मृत्यू झाला आहे. त्यांची गाडी महामार्गाच्या बाजूला असलेल्या सेफ्टी बीम बॅरियरला धडकली

    भारत राष्ट्र समिती (BRS) च्या आमदार लस्या नंदिता यांचा तेलंगणात रस्ता अपघातात मृत्यू (Lasya Nandita died in accident) झाला. जी लस्या नंदिता यांच्या कारला पतनचेरू येथे अपघात झाला. 23 फेब्रुवारीला पहाटे 5.30 वाजता आऊटर रिंगरोडच्या गतिरोधकाला धडकून त्यांचा मृत्यू झाला. सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट (SC) मधून २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार लस्या नंदिता या अवघ्या ३६ वर्षांच्या होत्या. त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव, भाजप अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी तरुण आमदाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

    10 दिवसांपूर्वीही झाला होता अपघात

    नलगोंडा येथे बीआरएसने आयोजित केलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहून हैदराबादला परतत असताना या वर्षी १३ फेब्रुवारीला लस्या नंदिताचा अपघात झाला. त्यावेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली आणि एका होमगार्डचा मृत्यू झाला. 1986 मध्ये जन्मलेल्या लास्याने 10 वर्षांपूर्वी वयाच्या 26 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर लास्याने राजकीय वारसा हाती घेतला. नंदिताने २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गणेश एन यांचा १७,१६९ मतांनी पराभव करून विजय मिळवला होता.