सौजन्य - नवराष्ट्र टीम
ओतर/मनोहर हिंगणे : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदिपजवळ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात दुचाकीवरील चारही तरुण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे डिंगोरे आणि मराडवाडी, आंबेदरा परिसरावर शोककळा पसरली असून, परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे.
१) आशिष ढवळु भले (वय २४, रा. मराडवाडी, फाळुकदरा, डिंगोरे ता. जुन्नर), २) दिपक सखाराम भले (वय २८, रा. मराडवाडी, फाळुकदरा, डिंगोरे ता. जुन्नर) ३) शिवराम नारायण पारधी (वय २६, रा. आंबेदरा, डिंगोरे ता. जुन्नर) ४) खंडु नारायण भले (वय २५, रा. आंबेदरा, डिंगोरे ता. जुन्नर) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विठ्ठलवाडी-पाथर्डी एसटी. बस (क्र. MH 20 BL 2983) ही माळशेज घाट मार्गे ओतूरच्या दिशेने येत होती. याच वेळी ओतूरच्या दिशेकडून डिंगोरेकडे एकाच दुचाकीवरून (स्प्लेंडर क्र. MH 14 MA 7849) चार तरुण चालले होते. महामार्गावरील हॉटेल जीवनदीपच्या थोडे पुढे येताच एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि चारही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या तरुणांपैकी तिघांना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत गोरे व डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर चौथ्या तरुणाला तातडीने आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु तेथील डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले.
हे सुद्धा वाचा : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू
भीषण अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या अपघाताबाबत ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत. एकाच गावातील चार तरुण मुलांचा अपघातात अशा रीतीने दुर्दैवी अंत झाल्याने डिंगोरे परिसरातील आदिवासी बांधवांवर आणि संपूर्ण जुन्नर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.






