File Photo : Parliament
नवी दिल्ली : नव्या सरकारचे लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू होईल. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री खासदार म्हणून शपथ घेतील. प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब त्यांना शपथ देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी शपथ घेणार आहेत. त्यानंतर मंत्री परिषदेचे इतर सदस्य खासदार म्हणून शपथ घेतील. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 280 नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जून रोजी 264 नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. त्यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
संसदेच्या या अधिवेशनात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास असणार नाही. या अधिवेशनात नीटच्या पेपरमधील अनियमितता, नेट परीक्षा रद्द होणे, पेपर फुटणे आदी मुद्द्यांवर विरोधकांकडून चर्चा होऊ शकते.
पहिल्यांदाच असणार विरोधी पक्षनेता
यावेळी पहिल्यांदाच नरेंद्र मोदींसमोर विरोधी पक्षनेता असेल. सभागृहातील विरोधी पक्षनेत्याचा दर्जा सभागृहनेत्याइतकाच असतो. निवडणूक आयुक्तांसह अनेक महत्त्वाच्या नियुक्ती समित्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याचा समावेश असतो. गेल्या दोन टर्ममध्ये नरेंद्र मोदींसमोर विरोधी पक्षनेता नव्हता.