नवी दिल्ली : प्रेषित पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान (Controversial Statement On Prophet) करणाऱ्या भाजपच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिलासा दिला. शर्मा यांच्या अटकेचे (Arrest) आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस कोर्टानं शुक्रवारी नकार दिला.
नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान करत मुस्लीम समाजाच्या भावना दुखवतील असं विधान केलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर गदारोळ माजला होता.
आखाती देशांनी याप्रकरणी भारतानं माफी मागावी अशी मोहिम सुरु केली होती. त्यानंतर भाजपकडून पक्षाच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांच्या विधानाच भाजप निषेध करतो असं स्पष्टीकरण देत त्यांना तात्काळ निलंबित केलं होतं.
दरम्यान, नुपूर शर्मांच्या या विधानामुळं देशभरात काही टार्गेट किलिंगच्याही घटना घडल्या. नुपूर शर्मांच्या पोस्टचं समर्थन करणाऱ्या काही हिंदू व्यक्तींना टार्गेट करत मुलतत्ववाद्यांकडून त्यांच्या हत्या करण्यात आल्या. यामध्ये राजस्थानातील उदयपूर इथं आणि महाराष्ट्रातील अमरावती इथं उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली होती.