File Photo : Electricity Supply
नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये तीव्र उष्णतेमुळे विजेची (Demand of Electricity) कमाल मागणी 246.06 गिगावॅटवर पोहोचली आहे. ऊर्जा मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी घरे आणि कार्यालयांमध्ये एअर कंडिशनर आणि कुलरचा वापर वाढल्याने विजेचा वापर वाढत आहे.
उर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात विजेची कमाल मागणी किंवा पुरवठा 246.06 गिगावॅट नोंदवला गेला, जो यावर्षीच्या उन्हाळी हंगामातील सर्वाधिक आहे. याआधी मंगळवारी विजेची कमाल मागणी 237.94 गिगावॅटवर पोहोचली होती. सप्टेंबर 2023 मध्ये 243.27 गिगावॅट इतका वीज वापराचा विक्रम आजपर्यंतचा होता. चालू उन्हाळी हंगामात सर्वाधिक मागणी यावर्षी 24 में रोजी 239.96 गिगावॅट इतकी नोंदवली गेली.
ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 23 मे रोजी कमाल मागणी 236.59 गिगावॅट होती. तर 22 मे रोजी ती 235.06 गिगावॅट होती. गुरुवारी दिल्लीत किमान तापमान 30.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाने दिवसाच्या उत्तरार्धात हलका पाऊस आणि धुळीच्या वादळाचा अंदाज वर्तवला आहे.
विजेची कमाल मागणी पोहचणार 260 गिगावॅटवर
या महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जा मंत्रालयाने मे महिन्याची विजेची मागणी दिवसात 235 गिगावॅट आणि संध्याकाळी 225 गिगावॅट असण्याचा अंदाज वर्तवला होता. त्याचवेळी, जून महिन्यात विजेचा वापर दिवसा 240 गिगावॅट आणि संध्याकाळी 235 गिगावॅट असेल, असा अंदाज आहे. मंत्रालयाने या उन्हाळ्यात विजेची कमाल मागणी 260 गिगावॅटवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.