नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. वाराणसी विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याला अज्ञात क्रमांकावरून फोन करून विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेदरम्यान वाराणसी विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्याने उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सीआयएसएफचे जवान वाराणसी विमानतळाची सखोल झडती घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच वाराणसीच्या फुलपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला भदोही येथून अटक केली.
धमकी देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी भदोही येथील रहिवासी असलेल्या अशोक प्रजापतीला पोलिसांनी भदोही येथून ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
आरोपीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकवर वाराणसीतील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत. सध्या पोलिस आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. तरुणाने वाराणसी विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याला फोन करून सायंकाळपर्यंत विमानतळाचा नकाशा बदलला जाईल, अशी धमकी दिली. यानंतर त्याने फोन कट केला.