सत्रापूर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार
रामटेक वनपरीक्षेत्रातील बोरडा ग्रामपंचायत अंतर्गत सत्रापूर गावात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमज्रांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्र रामटेक हद्दीतील गट ग्रामपंचायत बोरडा सराखा अंतर्गत सत्रापूर गाव आहे. येथे मागील आठवड्यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. सत्रापूर गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. गुरुवारी (दि.5) सत्रापूर येथील उदाराम आपतुरकर यांच्या शेतातील 2 शेळ्या, भीमराव ठाकूर यांचे एक वासरू तर देवमन उईके यांच्या दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत ठार केले. आता पावसाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम व बिट वनरक्षक रेखा चोंदे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहे या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी सत्रापूर गावकऱ्यांकडून केली जात आहे.
कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश अन् गुन्हेगाराचा शोध..! भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला ‘त्या’ खूनाचा छडा
वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ बघता उपसरपंच पंकज चौधरी यांनी आज सकाळी सत्रापूर येथे गाय ठार केलेल्या घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांना वाघाने घटनास्थळावरून सुमारे 100 मीटरपर्यंत गाईला ओढत नेल्याचे दिसून आले. या ठिकाणी वनविभागाने कॅमेरे देखील लावले होते, या कॅमेऱ्यामध्ये गाईजवळ वाघ उभा असल्याचे कैद झाले आहे. घटनास्थळी उपस्थित असतांना घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच उपसरपंच पंकज चौधरी यांना पुन्हा सत्रापूर गावालगत असलेल्या शेत परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. चौधरी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी बनसोडे यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या दिशेने वळविले. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.