भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला खुनाचा छडा
पुणे: गुन्हेगार आपण पोलिसांना सापडणार नाहीत, या भावनेतूनच गुन्हा करतो अन् निर्धास्तही राहतो. पोलीसही आपले ‘पण’ लावून गुन्हेगाराचा शोध लावतात हे भारती विद्यापीठ पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. कडकडणाऱ्या विजांच्या प्रकाशातून एका खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, २० दिवस, ३२० सीसीटीव्ही, १२०० रिक्षा आणि दीडशे गुन्हेगार धुंडाळत हे यश पदरी पाडले आहे. एका सराईत गुन्हेगाराकडून आंबेगाव येथील सर्व्हिस रोडच्या कडेला छिन्नविछीन्न अवस्थेत सापडलेल्या महिलेचा खून झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी शाहरूख शकील मन्सुर (वय २७, रा. हडपसर, मुळ. उत्तरप्रदेश) अटक केली आहे. घटनेत प्रिती सचिन वाखारे (वय ३१) या महिलेचा खून झाला असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगांवकर तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, सचिन सरपाले, मितेश चोरमोले व त्यांच्या पथकाने केली आहे.
लोणावळा खंडाळा परिसरात चोरीच्या घटनेत वाढ; लाखोंचा ऐवज लंपास, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
गेल्या महिन्यात (दि. २० मे) आंबेगाव बुद्रुक परिसरातील शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा रोडवरील सर्व्हिस रोडलगत पडत्या धो-धो पावसात एका महिलेचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह रात्री आढळून आला होता. प्रचंड पाऊस पडत असताना नागरिकांना हा प्रकार समोर आला होता. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी येथे धाव घेतली होती. तेव्हा महिलेवर वारकरून तिचा खून केल्याचे समोर आले होते. प्रथम तिची ओळखही पटली नव्हती. नंतर मात्र, तिची ओळख पटली. पण, तिचा खून कोणी व का केला हे समजू शकत नव्हते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने संशयित रिक्षा व इतर माहितीवरून आरोपी शाहरूख याच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
असा लागला खूनाचा छडा
घटनेच्या दिवशी प्रचंड पाऊस व कडकडणाऱ्या विजा सुरू होत्या. पोलिसांनी येथील खासगी व पोलिसांशी कनेक्ट असलेले ३२० सीसीटीव्ही तपासले. पण, पाऊस व अंधारामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु, एका सीसीटीव्हीत पावसात कडकडणारी वीज पडल्यानंतर झालेल्या प्रकाशात महिला एका रिक्षात बसत असल्याचे दिसून आले. मात्र सीसीटीव्हीत रिक्षा अस्पष्ट दिसत होती. केवळ काळे हूड व टीव्हीएसची रिक्षा असल्याचे स्पष्ट झाले. मग, आरटीओकडून टीव्हीएस रिक्षांची माहिती घेतली. तेव्हा शहरात १० हजार ७९४ रिक्षा टीव्हीएस नोंदणीकृत निघाले. पोलिसांनी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलेल्या रिक्षांची माहिती घेतली. तेव्हा १२०० रिक्षां समोर आल्या. खात्रीसाठी कात्रज ते नवले पुलावरील आणखी १५० सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपीच्या रिक्षा निष्पन्न झाला. त्यानूसार आरोपीची खात्री पटवून त्याला बेड्या ठोकल्या.