नवी दिल्ली : जेवढे अंतर कापले असेल तेवढाच टोल देण्याची व्यवस्था येत्या मार्च महिन्यापासून सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय महामार्ग तथा रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यसभेत सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नावर गडकरी म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात आली. असून, आता देशभरात ते लागू करण्याची तयारी करण्यात येत आहे. यात लोकेशन आधारित टोलची व्यवस्था असून, टोल रोडवर वाहनाने जेवढे कि.मी., अंतर कापले असेल तेवढाच टोल द्यावा लागणार आहे. यासाठी बँका आणि तंत्रज्ञान कंपन्यांची मिळून एक कंपनी तयार करण्यात येत आहे. ही कंपनी या व्यवस्थेचे संचालन करणार आहे.
यातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची वर्षाकाठी 15 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. देशात शतप्रतिशत वाहनांना फास्टटॅग बसविण्यात आले असून, आतापर्यंत 8 कोटी फास्टटॅग लावण्यात आल्याचेही गडकरी यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.






