मुंबई : राम मंदिर उद्घाटनावरुन (Ayodhya Ram Mandir Inauguration) विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील भाजपसह (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच अयोध्या राम मंदिर उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना आमंत्रित केले गेले नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी प्रकाशझोतात आणले आहे. तसेच मोदी सरकारने (Modi Govt) दहा वर्षात जनतेचं दिवाळं काढलं आहे असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधत भाजप सरकारला घेरले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र या दिवशी उद्धव ठाकरे हे अयोध्येला न जाता नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दर्शन करणार आहेत. तसेच गोदावरीच्या तीरावर पूजा देखील करणार आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रातील काळाराम मंदिराचे दर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. यासाठी त्यांनी रितसर पत्र लिहित हे आमंत्रण दिले आहे. काल (दि.12) पंतप्रधान मोदींनी देखील काळाराम मंदिराची पूजा केली. आता ठाकरे गटाने राष्ट्रपतींना या मंदिरामध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मंदिर उद्घाटनाच्या दिवशी देशभरामध्ये दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी देशभरामध्ये दिवाळी साजरी करायला लावली आहे ती तर चांगली गोष्ट आहे. परंतू, मागील 10 वर्षांमध्ये देशवासियांचं दिवाळं निघालं आहे यावर देखील चर्चा झाली पाहिजे” अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.