file photo
इम्फाळ : मणिपुरात हिंसाचार (Manipur Violence) धगधगतच असून, बुधवारी राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी एका शाळेबाहेर एका महिलेची गोळ्या झाडून हत्या (A Woman Killed) करण्यात आली. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटू शकली नाही.
मृतक महिला कोणत्या समाजाची आहे हे सुद्धा समजू शकलेले नाही. ही घटना राजधानी इम्फाळमध्ये शिशू निष्ठा निकेतन शाळेसमोर घडली. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. हिंसाचार सुरू असतानाच मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू होताच दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा मणिपुरात दहशतीचे वातावरण आहे.
इंटरनेट बंदीचे समर्थन
मणिपूरमध्ये सातत्याने होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्शवभूमीवर वारंवार इंटरनेट बंद करण्याविरोधात दोन स्थानिक नागरिकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने गुरुवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. सोबतच त्यांना या प्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. चोंगथम व्हिक्टर सिंग आणि मायंगबम जेम्स यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. पीएस नरसिम्हा आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली.
संसदीय समितीवर विरोधकांचा बहिष्कार
संसदेच्या गृह विभागाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी मणिपुरच्या स्थितीवर चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी या बैठकीवर बहिष्कार टाकला. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आणि कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह तसेच प्रदीप भट्टाचार्य यांनी समिती अध्यक्ष बृजलाल यांना पत्र लिहून मणिपुरातील स्थितीकडे डोळेझाक केली जाऊ शकत नाही असे म्हटले होते.