'सर्जिकल स्ट्राईक'पेक्षाही मोठी कारवाई होणार? आता तर विरोधकांकडूनही मिळतीये मोदींना साथ (Photo Credit- Social Media)
नवी दिल्ली : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.24) विधान केले होते. त्यानंतर आता यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी भारत सरकारला देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्वी कधीही न मिळालेल्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आता ‘सर्जिकल स्ट्राईक’पेक्षाही मोठी कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गुरुवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत 14 पक्षांचे 19 नेते सहभागी झाले होते. यावेळी, अनेक मुद्द्यावर मोदी सरकारला विरोध करणाऱ्या विरोधकांचा विरोध कमी झाल्याचे दिसून आले. हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, ‘दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल आपण पाकिस्तानवर निर्बंध लादू शकतो. केवळ ओवैसीच नाही तर पाकिस्ताननेही काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.
खासदार ओवैसी म्हणाले की, ‘सर्व पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. विरोधी पक्षाने सरकारला प्रत्येक प्रकारची कारवाई करण्यात पूर्ण पाठिंबा दिला आहे. म्हणजे, सरकार कोणतेही पाऊल उचलेल, विरोधी पक्ष त्याचे समर्थन करेल’.
कृती आराखडा तयार
सध्या 140 कोटी भारतीय फक्त अॅक्शनची वाट पाहत आहेत. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संकेत मिळण्याची वाट पाहत आहोत, असेही म्हणणे आहे. यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या मोहिमेवर आहेत. सर्व सुरक्षा एजन्सींसोबत दिवसरात्र बैठका घेतल्या जात आहेत आणि सर्व पर्यायांवर विचार केला जात आहे. सुरक्षा आणि राजनैतिक तज्ज्ञांचे मत देखील घेतले जात आहे.
सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकपेक्षाही मोठी कारवाई
जेव्हा भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी लष्करी कारवाई केली, तेव्हा मोदी सरकारला विरोधी पक्षांचा म्हणावा तसा पाठिंबा नव्हता. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जाऊन दहशतवादी तळ उडवले होते. त्यानंतर आता नव्या कारवाईची तयारी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.