मागील ५० वर्षांपासून ठाण्यातील कळवा भागात घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या चांदोरकर कुटुंबियांनाकडे यंदा शिवालयाचा मनमोहक देखावा साकारण्यात आलेला आहे. कळवा येथे राहणाऱ्या चांदोरकर कुटुंबियांच्या बाप्पाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने गणरायासाठी ही खास सजावट करण्यात आली आहे.
देखाव्यासाठी करण्यात आलेली सजावट ही ९५ टक्के पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून तयार करण्यात आली असून हा देखावा साकारण्यासाठी तब्बल तीन महिन्याचा कालावधी लागला. पालघर येथील कलाकार राजेश जव्हारकर यांनी हा देखावा साकारण्यासाठी मेहेनत घेतलेली आहे. या देखाव्यात शिवालयातील लहान सहन गोष्टी देखील दाखवल्या असून हे चित्रण मनाला मोहिनी घालते. यात डोंगरावर वसलेले शिवालय, त्यात शंकराची मूर्ती, खळाळून वाहणारा झरा, जंगलातून बागडणारे प्राणी असे देखाव्याचे एकूण रूप आहे.
यंदा आमच्या घरच्या गणपती बाप्पाचे ५० वे वर्ष आहे. परंपरागत आमच्या घरी गणरायाचे आगमन होत असते. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून काहीतरी आगळावेगळा देखावा साकारावा या उद्देशाने ही सजावट केलेली आहे, असे रमेश चांदोरकर यांनी सांगितले.