सोलापूर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी आज सकाळी राजकीय गौप्यस्फोट केला. सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना व प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपने (BJP) ऑफर दिली असल्याचा धक्कादायक खुलासा केला. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगताना दिसल्या. यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. परंतु आम्ही सुशीलकुमार यांना आणि प्रणिती शिंदे यांना ऑफर दिलेली नाही. माध्यमांमधून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर दिली.
पुढे बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर जहरी टीका देखील केली. बावनकुळे म्हणाले, ज्या काँग्रेसने प्रभू श्रीरामांना काल्पनिक म्हटलं आणि रामसेतू काल्पनिक असल्याचं प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलं, त्या काँग्रेसमध्ये आता काहीच उरलं नाही. त्यामुळे ज्यांना मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपमध्ये यायचं आहे, त्यांचं स्वागत आहे अशी देखील सकारात्मकता दाखवली.
महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही
उद्धव ठाकरेंवर टीका करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, पुढच्या काळात उद्धव ठाकरेंना उमेदवारसुद्धा मिळणार नाही, एवढी त्यांची वाईट अवस्था होईल. महाविकास आघाडीमधील घटकपक्षांवरदेखील हीच वेळ येणार आहे. महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. सोलापुरातही मोदींचं वादळ येणार आहे. महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्षव चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.