मुख्यमंत्री फडणवीस यांचे भास्कर जाधवांना प्रत्युत्तर (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया )
नागपूर: राज्यात सध्या नागपूर येथे महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पहिल्यांदाच भाषण केले. राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला पूर्ण बहुमत दिले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान राज्यपालांच्या भाषणावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. भास्कर जाधव यांनी ‘माझे सरकार’ यावरून आक्षेप घेतला होता. यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अधिवेशनाने झाली. त्यामध्ये त्यांनी ‘माझे सरकार’ असा उल्लेख केला. तसेच राज्यपालांनी माझे सरकार असे म्हटल्याने घटनात्मक आणि संविधानात्मक पदाची पायमल्ली झाल्याची टीका त्यांनी केला. दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. भास्कर जाधव यांच्या आरोपाना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आमचे मीतर भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या माझे सरकार या शब्दावर आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले. ते फार हुशार आहेत. त्यांनी अनेक वर्षे राज्यपालांचे अभिभाषण ऐकले आहेत. कदाचित ते शाळेत असताना नागरिकशास्त्राच्या तासाला दांडी मारत असतील. कारण शासन हे मुख्यमंत्ऱ्यांच्या नावाने चालत नाही. शासन हे राज्यपालांच्या नावाने चालते. हे त्यांना माहिती नसावे.”
मोकळ्या मनाने जनादेश स्वीकारावा – फडणवीस
निकाल आपल्या बाजूने आला की सर्व काही चांगले. विरोधात निकाल आला तर ईव्हीएमवर आरोप करायचे. ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते. मात्र तिथे सिद्ध करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष गेला नाही. त्यामुळे जनतेने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा. आम्ही तो लोकसभेत स्वीकारला, त्यावर काम केले. आम्ही ईव्हीएमवर खापर फोडले नाही. फेक नरेटीव्हमुळे आम्ही हरलो.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना विधानसभेत फडणवीस म्हणाले, “विरोधकांनी जनतेने दिलेला निकाल खुल्या मनाने स्वीकारावा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तोवर तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील.” यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेरोशायरी करत विरोधकाना टोला लगावला आहे.
‘उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आइना साफ़ करता रहा’,अशा ओळी विधानसभेत ऐकवत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा साफ करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी खोचक टोला लगावला.