देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला पूर्ण बहुमत दिले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार हे सातत्याने उपमुख्यमंत्रीम्हणून शपथ घेत असल्याने त्यांचा उल्लेख पर्मनंट उपमुख्यमंत्री असा केला जात आहे. सोशल मिडिया किंवा अन्य ठिकाणी आशा कमेंट केल्या जात आहेत. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या कमेंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
गेले अनेक दिवस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना पर्मनंट उपमुख्यमंत्री या कमेंटद्वारे किंवा याद्वारे लक्ष्य केले जात आहे. विरोधक त्यांना टोला लगावत आहेत. यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवार तुम्हाला लोक आणि विरोधक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा.” देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत असे भाष्य केले.
मोकळ्या मनाने जनादेश स्वीकारावा – फडणवीस
निकाल आपल्या बाजूने आला की सर्व काही चांगले. विरोधात निकाल आला तर ईव्हीएमवर आरोप करायचे. ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते. मात्र तिथे सिद्ध करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष गेला नाही. त्यामुळे जनतेने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा. आम्ही तो लोकसभेत स्वीकारला, त्यावर काम केले. आम्ही ईव्हीएमवर खापर फोडले नाही. फेक नरेटीव्हमुळे आम्ही हरलो.
हेही वाचा: Devendra Fadnavis: “धूल चेहरे पे थी, आइना साफ़…”; फडणवीसांचा ‘मविआ’ला जोरदार चिमटा
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना विधानसभेत फडणवीस म्हणाले, “विरोधकांनी जनतेने दिलेला निकाल खुल्या मनाने स्वीकारावा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तोवर तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील.” यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेरोशायरी करत विरोधकाना टोला लगावला आहे.
‘उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आइना साफ़ करता रहा’,अशा ओळी विधानसभेत ऐकवत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा साफ करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी खोचक टोला लगावला.
नक्षलवादाविरुद्ध लढाई पुकारली – फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपण नक्षलवादाविरुद्ध लढाई पुकारली. नक्षलवादी म्हणतात की आमचा भारताच्या संविधानवर विश्वास नाही. लोकशाहीवर विश्वास नाही. आता देशामध्ये नक्षलवादाविरुद्ध मोठी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे आम नक्षलवादी संपायला लागले. नवीन भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आता तो नक्षलवाद शहरांमध्ये जागा शोधायला लागला आहे.”