उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली (फोटो - सोशल मीडिया)
Eknath Shinde Marathi News : मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण भेटी झाल्या आहेत. यामध्ये राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. यावेळी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे हे मागे बसल्यामुळे आता जोरदार वाद पेटला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये हे नेते मागे बसलेले असल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात. त्यांना त्याचं काहीही वाटणार नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “त्यांना या गोष्टीचं काही वाटत नसेल तर मी यावर काय प्रतिक्रिया देणार. खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर मला त्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात. त्यांना त्याचं काहीही वाटणार नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल. यामुळे मी त्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. हे उलट तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं”, असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहे. विकासाचा विचार पुढे घेऊन चाललो आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना काही देशांचा दौरा करणाऱ्या डिलीगेशनचा हेड बनवला आहे. त्यामुळे मोदींना कोणाचा सन्मान करायचा, कोणाला मान द्यायचा हे त्यांना माहिती आहे. यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललोय हा त्या विचाराचा सन्मान आहे. ज्यांचा अवमान झाला, त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर मी काय प्रतिक्रिया देणार तुम्ही त्यांना विचारायला हवं. ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, ज्यांनी विचार सोडले, त्यांचं हे असंच होणार आहे. त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली. त्यामुळे अनेक लोक म्हणतात की विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात”, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.