मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वच मनपा आयुक्तांनी धोकादायक इमारतींचा पुनर्विकास(Redevelopment Of Dangerous Buildings) रखडण्यामागे मालक, भाडेकरू यांच्यातील वाद, कायदेशीर प्रक्रियेत स्थगिती मिळाल्याने रखडलेला पुनर्विकास आणि पुनर्वसनातील अडचणी कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले आहे. याबाबत मुंबई(Mumbai) महानगर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेला आपल्या हद्दीत क्लस्टर योजना राबवण्याचा विचार करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिले आहेत.
काय बदल करता येतील ते सुचवण्याचे निर्देश
ज्या इमारती क्लस्टर योजनेत समाविष्ट होऊ शकत नाहीत त्याच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून काय उपाययोजना करता येतील किंवा सद्यस्थितीत केलेल्या उपाययोजनामध्ये नक्की काय बदल करता येतील ते सुचवण्याचे निर्देशही शिंदे यांनी संबंधित पालिका आयुक्तांना दिले.
धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाला गती मिळावी यासाठी न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांमध्ये जलद निकाल देण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
[read_also content=”औद्योगिक वसाहतीतील कारखान्याचे नसते उद्योग भोवले, प्रदूषित पाण्याने सावित्री नदीतील पाणी झाले लाल https://www.navarashtra.com/latest-news/savitri-river-water-became-red-after-chemical-left-from-midc-at-mahad-nrsr-142651.html”]
याबाबत नगरविकास मंत्र्यानी सर्व पालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महेश पाठक आणि एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न
प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न भेडसावत असल्याने अशा इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी प्रत्येक मनपा हद्दीत ट्रान्झिट कॅम्प उभे करावेत, त्यासाठी निधीची तरतूद करावी, असेही शिंदे यांनी सांगितले.
धोकादायक इमारत कोसळल्यास तातडीने मदत करण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात येते. या पथकाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेने टीडीआरएफ पथक तयार केले आहे. या पथकाने उल्हासनगर इमारत दुर्घटना आणि महाड इमारत दुर्घटनेवेळी उल्लेखनीय काम केले होते. त्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेने असे तातडीने मदत देऊ शकणारे पथक निर्माण करावे, जेणेकरून अशी दुर्घटना घडल्यास वेळ न घालवता तातडीने मदतकार्य सुरू करून जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवता येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.