पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन एक्सप्रेस सुरू (फोटो- ai gemini)
पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू
रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा
भाविक आणि पर्यटकांची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर पूर्ण
पुणे: पुणे आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो भाविक आणि प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज १७ जून २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल.
या थेट रेल्वे सेवेमुळे भाविक आणि पर्यटकांची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर पूर्ण होत आहे. ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठी आहे. ही पहिली थेट रेल्वे सेवा असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि गट-पर्यटकांचा प्रवासाचा त्रास वाचणार आहे. सुरक्षित, परवडणारा आणि आरामदायी प्रवास उपलब्ध झाल्यामुळे वृद्ध भक्तांची मोठी सोय होईल.
स्थानिक अर्थव्यवस्था आणि शिक्षणाला गती
या रेल्वेमुळे केवळ धार्मिक पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. शिर्डी परिसरातील हॉटेल्स, टॅक्सी व्यावसायिक आणि छोट्या विक्रेत्यांच्या व्यवसायात वाढ होईल. तसेच, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील रहिवाशांना पुण्यातील उच्च शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर असेल थांबा
दौंड कॉर्ड केबिन: पुणे आणि मनमाड मार्गादरम्यान जलद प्रवासासाठी उपयुक्त.
श्रीगोंदा: स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर.
अहिल्यानगर: प्रशासकीय व लष्करी केंद्रातील नोकरदारांसाठी सोयीचे.
राहुरी: येथील ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठातील’ विद्यार्थी आणि संशोधकांना मोठा लाभ.
बेलापूर: साखर कारखान्यांचे क्षेत्र आणि प्रसिद्ध ‘शनि शिंगणापूर’ मंदिराचे प्रवेशद्वार
‘तत्काळ’ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल
पश्चिम रेल्वेच्या कोटा विभागाने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेच्या नियमात काही महत्त्वाचे बदल केल्याची माहिती समोर आली आहे. तिकीट प्रकिया सुधारण्यासाठी, पश्चिम मध्य रेल्वेच्या (WCR) कोटा विभागाने आपल्या सर्व स्थानकांवर टोकन प्रणाली सुरू केली आहे. या निर्णयाचा उद्देश प्रवाशांची सोय वाढवणे, पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि तिकीटाच्या ठिकाणी लागणाऱ्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.






