प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा (फोटो सौजन्य-ChatGPT)
पुणे : महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती, पुणे यांच्या वतीने एसटी कामगारांच्या विविध आर्थिक व प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. विभाग नियंत्रक कार्यालयासमोर दुपारी १:३० ते २:०० या वेळेत कामगारांनी जोरदार ‘घंटानाद’ करत आणि ‘महाआरती’ करून प्रशासनाचा व शासनाचा निषेध करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
या आंदोलनाद्वारे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आला. सोमवारी झालेल्या या आंदोलनाने कामगारांमधील तीव्र असंतोष समोर आला आहे. आंदोलनकर्त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित दराने महागाई भत्ता आणि त्याचा थकीत फरक त्वरित मिळावा. १० टक्के, २० आणि ३० या सुधारित दराने घरभाडे भत्ता आणि त्याचा फरक कामगारांना अदा करण्यात यावा.
MSRTC Fare Hike : एसटी प्रवाशांना दिलासा नाही! १०% हंगामी भाडेवाढीला आणखी महिनाभर मुदतवाढ
सन २०१६ ते २०२० या कालावधीतील वार्षिक वेतनवाढीच्या १ टक्के फरकाची थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळावी. सर्व एसटी कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस मेडिक्लेम आरोग्य सुविधा लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आले.
तसेच राज्यातील सर्व डेपो आणि कार्यालयांसमोर २२ रोजी ‘द्वारसभा’ घेऊन कामगारांना संघटित केले जाईल. तर यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास २९ जूनपासून संपूर्ण राज्यभर तीव्र धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा यावेळी कृती समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिलीप परब, विभागीय सचिव मोहन जेधे, विभागीय कोषाध्यक्ष सागर दिघे आणि कामगार काँग्रेसचे बाप्पू ढावरे यांसह असंख्य कर्मचारी होते.
10 टक्के हंगामी भाडेवाढीस मुदतवाढ
वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन नाईलाजास्तव साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव भाडेदर आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) कायम राहणार आहेत.






