महाराष्ट्राला पावसाचा इशारा (फोटो- सोशल मीडिया)
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
नुकसानीचे पंचनामे करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
Maharashtra Weather Update: राज्यात नुकतीच थंडी संपून उन्हाळा सुरू होईल असे दिसत असतानाच अवकाळी पावसाने राज्यातील विविध भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे. अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना देखील बसताना दिसून येत आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेले काही दिवस राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाल्याचे समोर आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पिकांचे देखील नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. काल पावसाने कोकण, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी देखील हजेरी लावली आहे.






