ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
IND-A vs SA-A : पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन विकेट्सने धूळ चारली आहे. या सामन्यात रोमांचक वळण आली. परंतु अखेर ऋषभ पंत, आयुष बदोनी आणि अंशुल कंबोज यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने २७५ धावांचे लक्ष्य सहज गाठले. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या दुसऱ्या डावात भारतासमोर २७५ धावांचे आव्हान दिले होते. ज्याचा भारतीय फलंदाजांनी संघर्षानंतर यशस्वीपणे पाठलाग करत दक्षिण आफ्रिका अ संघावर ३ विकेट्सने विजय मिळवला.
भारत अ संघासाठी, कर्णधार ऋषभ पंतने दुखापतीतून सावरत मैदानात पुनरागमन केले. त्याच्या क्लासिक फलंदाजीचे एक उत्तम उदाहरण त्यान दाखवून दिले. त्याने दुसऱ्या डावात ११३ चेंडूत ९० धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. तो शतकापासून केवळ १० धावा दूर राहीला असला तरी, त्याच्या खेळीने संघाच्या विजयाचा पाया रचण्यात मोठी कामगिरी केली. आयुष बदोनीनेही ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सामना महत्त्वाच्या टप्प्यावर असताना, अंशुल कंबोजने खालच्या क्रमवारीत ३७ धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. तनुष कोटियनने २३ धावा जोडून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय फलंदाजांची बुद्धिमत्ता आणि पंतच्या कर्णधारपदाने हे कठीण लक्ष्य साध्य करण्यात मोठे योगदान दिले. पंतची आक्रमक रणनीती आणि संयमी फलंदाजीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
दक्षिण आफ्रिका अ संघाचा दुसरा डाव कमकुवत होता.
दक्षिण आफ्रिका अ संघाचे फलंदाज दुसऱ्या डावात पूर्णपणे अपयशी ठरले, त्यांना फक्त १९९ धावांवरच रोखण्यात आले. आफ्रिकन संघासाठी, फक्त झुबैर हमजा आणि लेसो सेनोकवानेच प्रत्येकी ३७ धावा केल्या. उर्वरित फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. भारताकडून तनुष कोटियनने शानदार गोलंदाजी करत चार बळी घेतले, तर अंशुल कंबोजने तीन फलंदाजांना माघारी पाठवले.
पहिल्या डावात देखील कोटीयनची कामगिरी प्रभावी राहिली होती. पहिल्या डावात चार विकेट घेतल्या आणि आफ्रिकन संघाची आघाडी मर्यादित राखण्यात यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३०९ धावा केल्या, ज्यामध्ये जॉर्डन हरमनने ७१, झुबेर हमजा यांनी ६६ आणि रुबिन हरमन यांनी ५४ धावा फटकावल्या. भारताकडून मानव सुथार आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
हेही वाचा : PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम
भारतीय संघ पहिल्या डावात केवळ २३४ धावाच उभारू शकला. ज्यामध्ये आयुष म्हात्रेने ६५ धावा केल्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडे ७५ धावांची आघाडी होती. तथापि, दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांना चांगलेच आढकणीत आणले. यामुळे भारत अ संघाने सहज लक्ष्य गाठले आणि तीन विकेटने विजय मिळवला.






