बाबर आझम आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Babar Azam breaks Virat Kohli’s record : पाकिस्ताचा स्टार फलंदाज बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावांमध्ये ५०+ धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या खास बाबतीत, त्याने भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे. भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने २०१० ते २०२४ दरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९ डावांमध्ये ५०+ धावा फटकावल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावून बाबरने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. आता बाबर आझमच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४० डावांमध्ये ५०+ धावा करण्याचा विक्रम जमा झाला आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतिला तिसरा आणि शेवटचा १ नोव्हेंबर रोजी गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने सहा चेंडू शिल्लक असताना चार विकेट राखून विजय मिळवला. प्रतिस्पर्ध्याच्या १४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बाबर आझमने शानदार कामगिरी केली. तो पाकिस्तानसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरून त्याने एकूण ४७ चेंडूंचा सामना केला आणि १४४.६८ च्या स्ट्राईक रेटने ६८ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ९ चौकार लगावले.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली. पाकिस्तानी संघाने मालिका २-१ अशी जिंकण्यात यश मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिला सामना ५५ धावांनी जिंकला. परंतु, त्यानंतर पाकिस्तानने दुसरा सामना ९ विकेट राखून आणि तिसरा सामना ४ विकेट राखून जिंकला व मालिका २-१ अशी खिशात घातली.






