नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी(फोटो-सोशल मीडिया)
Traffic guidelines issued in Navi Mumbai : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना रविवारी नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना खेळवण्याच्या वेळात मैदानावर पावसाची फटके बाजी सुरू आहे. त्यामुळे आता सांमन्याला विलंब होत आहे. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी व्यापक सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाची तयारी केली आहे. सामना सुरळीत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा देखील तैनात केला आहे.
स्टेडियम आणि परिसरात सुमारे १,००० सुरक्षा कर्मचारी तैनात केले गेले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये एक पोलिस उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्त, ९० हून अधिक अधिकारी आणि ४५० हून अधिक कॉन्स्टेबल यांचा समावेश असून वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि वॉर्डन देखील तैनात करण्यात आलेले आहेत.
हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : होबार्टमध्ये टिम डेव्हिड-स्टोइनिसचे वादळ! ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य!
प्रेक्षकांच्या मोठ्या गर्दीमुळे आणि हजारो वाहनांच्या हालचालीमुळे होणारी वाहतूक कोंडी हाताळण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. परिणामी, स्टेडियमभोवतीच्या अनेक रस्त्यांवर वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलिसांकडून विशेषतः प्रेक्षकांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बेस्ट आणि एनएमएमटी बसेससारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची विनंती करण्यात आली आहे. नागरिकांनाही लवकर प्रवास सुरू करण्याचे आवाहन केले गेले आहे. अनधिकृत पार्किंगवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा : PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम
अंतिम सामना बघण्यासाठी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक ठिकाणी तात्पुरती पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. या पर्यायी पार्किंग ठिकाणी टांगाईल मैदान, भीमाशंकर मैदान, एनएमएमसी स्टॅक पार्किंग, यशवंतराव चव्हाण मैदान, रामलीला मैदान, आचार्य श्री तुलसी उद्यान आणि बेलापूरमधील सुनील गावस्कर मैदान यांचा समावेश आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासासाठी पोलिस पूर्णपणे सज्ज झाले आहेत. अवैध पार्किंगवर त्वरित कारवाई करण्यासाठी घटनास्थळी चार टोइंग व्हॅन, दोन दुचाकी टोइंग व्हॅन आणि एक हायड्रा क्रेन देखील तैनात करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान कोणती देखील गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांकडून नागरिकांना सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






