मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनावरून जयकुमार गोरे यांनी खासदार शरद पवारांवर निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
सोलापूर : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन सुरु केले आहे. जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण केले असून त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय नेते देखील यावर प्रतिक्रिया देत आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यावरुन भाजप नेते व मंत्री जयकुमार गोरे यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाबाबत जयकुमार गोरे म्हणाले की, एकनाथ शिंदे असू दे किंवा देवेंद्र फडणवीस…मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत जे झालं नाही ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. कोणी कितीही शिव्या श्राप दिल्या तरी मुख्यमंत्री म्हणून 10 टक्के आरक्षण देण्याचे काम फडणवीस यांनी केलं. हॉस्टेल, मोफत शिक्षण अशा अनेक गोष्टी मराठा समाजासाठी दिल्या. 58 लाख कुणबी नोंदी याचं सरकारने केल्या. आणखी काय असेल, तर त्यासाठी देखील हे शासन प्रयत्न करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना सर्वश्रेष्ठ.. त्यात राहून सर्व देण्याचे काम सरकार करत आहे, अशी भूमिका जयकुमार गोरे यांनी मांडली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मराठा आरक्षणावर भूमिका मांडणाऱ्या शरद पवारांवर जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांना उशिरा सुचलेलं शहाणपणं आहे. 35 वर्षे सतेत होता काय केलं? फक्त तुम्ही सल्ला देण्याचे काम करत आहेत. जर गरज असेल, तर तेही शासन म्हणून करू . पण तुमच्याकडून झालं नाही, हे तुम्ही मान्य करणार आहात का? कोणाचे आरक्षण काढून दुसऱ्यांना देणे उचित नाही, असे देखील स्पष्ट मत जयकुमार गोरे यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईमध्ये आंदोलन होत असल्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवर आणि रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलक असल्यामुळे चाकरमान्यांना अडचणी येत आहेत. याबाबत जयकुमार गोरे म्हणाले की, आंदोलन झालं काही झालं, तरी त्रास कोणाला कोणाला होतच असतात आंदोलकांना देखील त्रास होतच असतो, पण घटनेने आंदोलनाचे अधिकर दिले आहे. या आंदोलनातून मार्ग निघाला पाहिजे, त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. हा समाज आपला आहे. राज्यकर्ता हा सर्वांना सोबत नेणारा असला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, हे सर्वांना सोबत नेणारे आहेत. मार्ग यातून नक्की निघेल, समाज एकसंध राहिला पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे.