भारत विरुद्ध इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T२० मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर होणार आहे. भारताने या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना इंग्लंडसाठी ‘करा किंवा मरो’ अशी झाली आहे. पुढील तीन सामन्यांमध्ये इंग्लंडने एकही सामना गमावला तर ते मालिका गमावतील. मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
जर बटलर या सामन्यात १८ धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो भारतीय भूमीवर T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. हा विक्रम सध्या अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीच्या नावावर आहे, ज्याने २५ टी-२० सामन्यांमध्ये २५.२७ च्या सरासरीने आणि १६४.४९ च्या स्ट्राईक रेटने ५५६ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे आणि या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९ धावा आहे.
दुसरीकडे, बटलरने आतापर्यंत भारतीय भूमीवर १९ टी-२० सामन्यांमध्ये ४४.९१ च्या सरासरीने आणि १५३.५६ च्या स्ट्राइक रेटने ५३९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक ४५८ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल येतो, ज्याने १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४४५ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानचा मोहम्मद शहजाद ४३५ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
भारताविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, जिथे त्याने दोन सामन्यांमध्ये ५६.५० च्या सरासरीने ११३ धावा केल्या आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने ६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लिश कर्णधाराने ४५ धावांची इनिंग खेळली. मात्र, त्याचे दोन्ही डाव व्यर्थ गेले आणि संघाचा पराभव झाला.
टीम इंडियाचा इंग्लडविरुद्ध मालिकेचा चौथा सामना ३१ जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर शेवटचा मालिकेचा पाचवा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
We have named an unchanged team for our third T20I v India as we look to pull one back in the series 🙌
The game will get underway at 13:30 GMT (19:00 local) in Rajkot tomorrow ⏰ pic.twitter.com/5LQJPO3s5B
— England Cricket (@englandcricket) January 27, 2025
बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.