MSCE Exam: "उमेदवारांचा कोणताही दोष नाही..."; रद्द झालेल्या परीक्षेबाबत उपायुक्त प्रिया शिंदे यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर, परीक्षा परिषदेने पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या संपूर्ण प्रकरणात उमेदवारांचा कोणताही दोष नसल्यामुळे, रद्द झालेली परीक्षा पुन्हा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी (Re-registration) करण्याची किंवा कोणतेही परीक्षा शुल्क देण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली आहे.
ठाणे आणि भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आतापर्यंत ३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ज्या उमेदवारांनी आधीच यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तसेच त्यांच्याकडून कोणतीही अतिरिक्त फी आकारली जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. चौकशीच्या अंतिम अहवालात जे कोणी दोषी निष्पन्न होतील, मग ते अधिकारी असोत की बाहेरील व्यक्ती, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या पेपरफुटी प्रकरणी सध्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
लक्षणीय बाब म्हणजे अशा यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेला उमेदवारांची रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली होती. अशातच आता पेपर लीक झाल्यामुळे शिक्षण विभागाने ही परीक्षा रद्द करत परीक्षा स्थगितीचा निर्णय घेतला. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी साधारणपणे तीन आठवड्यांची (२१ दिवस) प्रक्रिया आवश्यक असते. त्यामुळे परीक्षेचे पुढील नियोजन अत्यंत लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाईल.
महाराष्ट्र भरात ही परीक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली होती.
एकूण उमेदवार: ६ लाख १६ हजार १२५ (6,16,125)
परीक्षा केंद्रे: १,७२८
एकूण ठिकाणे: ३७






