महिंद्रा कंपनी आपल्या आगामी ‘व्हिजन S’ या सब-४ मीटर एसयूव्हीच्या प्रोडक्शन वर्जनची भारतात जोरदार टेस्ट घेत आहे. ही एसयूव्ही पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता असून नुकतीच स्पिती व्हॅलीतील आव्हानात्मक रस्त्यांवर हाय-अल्टिट्यूड चाचणीदरम्यान ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दमदार डिझाईन आणि मस्क्युलर लुक
स्पिती व्हॅलीत दिसलेल्या टेस्ट मॉडेलवरून या एसयूव्हीचा बॉक्सी आणि मस्क्युलर लुक स्पष्टपणे दिसून येतो. तिची उंच रचना, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि शॉट ओव्हरहँग्समुळे हिला जबरदस्त ‘रोड प्रेझन्स’ मिळतो. समोरच्या बाजूला ६-स्लॉट रेडिएटर ग्रिल, एलइडी हेडलाईट्स आणि सपाट बॉनेट देण्यात आले आहे.
बाजूच्या भागाचा विचार केल्यास यात मस्क्युलर व्हील आर्चेस, स्क्वेअर विंडोज, फ्लश-फिटेड डोअर हँडल्स आणि ५-डबल-स्पोक अलॉय व्हील्स पाहायला मिळतात. तसेच पाठीमागील बाजूस उघडणारे टेलगेट दिले असून त्यावर स्पेयर व्हील बसवण्यात आले आहे, जे हिला अस्सल ऑफ-रोडर लुक देते.
महिंद्राच्या या ५ आयकॉनिक ‘लिमिटेड एडिशन’ गाड्या तुम्हाला माहित आहेत का? पहा एका क्लिकवर
प्रीमियम फिचर्स आणि केबिन
या एसयूव्हीच्या इंटेरियरमध्ये व्हर्टिकल एसी व्हेंट्ससह अपराईट डॅशबोर्ड पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात पॅनोरॅमिक सनरुफ दिलेला आहे, ज्यामुळे केबिन अतिशय हवेशीर आणि प्रीमियम वाटते.
याशिवाय या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि वायरलेस स्मार्टफोन चार्जर यांसारखे आधुनिक फिचर्स मिळण्याची दाट शक्यता आहे.
सुरक्षा आणि इंजिन क्षमता
सुरक्षेच्या दृष्टीने महिंद्रा या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा सिस्टीम आणि ADAS सारखी फीचर्स देऊ शकते.
ही एसयूव्ही महिंद्राच्या नवीन ‘NU_IQ’ मोनोकॉक प्लॅटफॉर्मवर आधारित असून ती १.२-लीटर टर्बो-पेट्रोल आणि १.५-लीटर टर्बो-डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
भारतीय बाजारातील स्पर्धा
ही नवी एसयूव्ही बाजारात आल्यानंतर तिची थेट स्पर्धा भविष्यात येणाऱ्या रेनो ब्रिज आणि टाटाच्या ‘स्कार्लेट’ या येणाऱ्या एसयूव्हीशी पाहायला मिळेल.






